खलिल जिब्रानने काय दिले?
डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा
खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा व्यापार बंद पडला.पारंपरिक धंदे बुडाले. बहुसंख्य लोकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. शिवाय तुर्की अधिकारी छळ करीत, म्हणून अनेकांनी देशत्याग केला. त्यातच खलिल, आई व भावंडांबरोबर अमेरिकेला गेला. तरी तो एकटा परत आला. त्याचा बाप लेबनॉनमध्येच होता. बैरुत येथे ग्रॅज्युएट झाला. अनेक विषय त्याने आत्मसात केले. भ्रमणही खूप केले. पॅरीसला चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९११ पासून तो न्यूयॉर्कला स्थायिक झाला. जिब्रानचे कुटुंब सावत्र आई-बाप, भावंडांचे होते. पण मनाचे पुरोगामी औदार्य हा त्यांचा सामायिक गुण. एकमेकांना त्यांनी नेहमीच साथ दिली. जिब्रानने आपले चिंतन प्रेषितांच्या तोंडून मोजक्या शब्दात काव्यमय शैलीत मांडले ते त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी. त्याने ते आईला दाखविले. त्या असामान्य स्त्रीने त्याला उत्तेजन देऊन प्रसिद्ध करण्याची घाई करू नये असा सुज्ञ सल्ला दिला. नंतर अनेक वेळा सुधारणा करून त्याने २५ वर्षे धीर धरला. ‘प्रॉफेट’ हे पुस्तक १९२३ साली प्रथम इंग्रजीत व नंतर अरबी भाषेत प्रसिद्ध झाले. आपल्या अध्यात्मिक विकासाचे चित्रण त्याने ‘गार्डन ऑफ दि प्रॉफेट’मध्ये केले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. यांत्रिक जीवनशैलीला उबगलेल्या अमेरिकनांना या दोन पुस्तकांनी वेड लावले. गद्यकाव्ये, रूपककथा असे लिखाणही त्याने विपुल केले. जीवनातील विसंगतींवर तो खेळकर टीका करतो तर स्त्रीवरील अन्यायाचे हृदयदावक चित्रणही करतो. पॅरीस येथे त्याने ‘बंडखोर आत्मे’ हा छोटासा कथासंग्रह लिहिला. त्यातून तुर्की राज्यकर्ते व पादी यांनी लेबनॉनच्या जनतेचे चालविले शोषण जगापुढे मांडले. त्यामुळे तरुणांची मने पेटली पण पाद्यांनी पुस्तकाची जाहीर होळी केली. त्याला धर्मबाह्य ठरविले. तुर्कांनी त्याला हद्दपार केले पण अमेरिकेत तो सुखरूप होता. मानवाचा पुत्र येशू. हेसुद्धा कल्पनाशक्तीचा अजब आविष्कार आहे.
जिब्रान अत्यंत धार्मिक आहे. तो देव मानतो मात्र माणसाला पापी ठरवून त्याचे नियंत्रण व शोषण करणारी चर्चची सत्ता त्याला मान्य नाही. ख्रिश्चन असून तो पुनर्जन्म मानतो. जे बुद्धीला व भावनेला पटले ते व्यक्त करताना त्याला कुणाचे भय नसते. परिणामांची पर्वा नसते. धर्मश्रद्धा व देशप्रेम यात संकुचितपणाचा लवलेश नाही. त्याच्यात अनेक विसंगती आहेत पण कोणतीही गोष्ट तो सोयिस्करपणे स्वीकारत नाही. तो महामानव असला तरी एक साधासुधा माणूसही आहे. सततच्या आत्मपरीक्षणामुळे स्वत:ला तो पूर्णपणे ओळखतो. मागे वळून पाहिल्यावर त्याला स्वत:चा क्षुदपणा, रुक्षपणा व बडबड्या स्वभाव यांची लाज वाटते. मन भूतकाळात रमत नाही. त्याला गावाची तीव्र ओढ आहे, आई व बहिणीवर त्याचे नितांत प्रेम आहे. पण मन रोमँटिक परंपरेतले नाही. जिब्रानने लग्न केले नाही. कोणत्याही प्रेमळ स्त्रीची अपेक्षा आपण पुरी करू शकणार नाही हे तो ओळखून होता. तरी तो प्रेमी होता. पण त्याचे प्रेम वैषयिक नव्हते. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया येऊन गेल्या. बारबारा यंग ही त्याची शिष्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ होती. तिनेच त्याचे चरित्र लिहिले. पण दोघे एका खोलीत कधी राहिले नाहीत. ‘मी जियादा’ ( May Ziadeh ) ही त्याची खास प्रेयसी. इजिप्तला स्थायिक झालेली. १९ वर्षे दोघांचे प्रेम व पत्रव्यवहार टिकून होते. जिब्रानच्या मृत्यूनंतर तो प्रसिद्ध झाला, तेव्हा जगाला या स्त्रीबद्दल कळले. दोघे एकमेकांना कधी भेटले नाहीत. त्याने तिचा फोटोसुद्धा कधी मागविला नाही. विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।
त्याला मृत्यूचे भय नव्हते तरी मरायची इच्छा नव्हती, कारण आणखी काही काम बाकी होते. तो स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नसे. डॉक्टर मंडळी त्याला वाचविण्याची शिकस्त करीत होती. पण त्यांच्या प्रयत्नांवर जिब्रानचा विश्वास नव्हता. विश्रांती त्याला शिक्षा वाटे. ती भोगायला तो तयार नव्हता. त्याला शांत एकांताची ओढ होती. तरी न्यूयॉर्कच्या कोलाहलातच त्याच्या प्रतिमेला धार येई. सत्याला अखंड ओळखा पण शब्दबद्ध क्वचितच करा, असे तो म्हणतो पण सत्य सांगतच राहतो. तो स्वत:ला एक ढग मानतो, वस्तूंशी मिसळणारा पण एकरूप न होणारा. तरी कुणाकडून तरी ‘तू एकटा नाहीस’ हे ऐकू इच्छितो. त्याचे मन मोठे, करुणा विशाल म्हणून दु:खही मोठे. त्यापासून त्याला पलायन नकोय. साऱ्या जगाचे सुख मिळत असेल तरी त्या बदल्यात तो आपले दु:ख द्यायला तयार नव्हता. ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे जाईल कुठे? मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे?’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए। हर एक दिल को गमे-जावीदा नही मिलता.’
जिब्रान, टागोर व इक्बाल हे तीन महाकवी समकालीन. अनेकांच्या मते जिब्रान त्यात सर्वश्रेष्ठ. टागोरांना ‘नोबेल’ मिळाले, इक्बालला वगळले गेले म्हणून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. या सन्मानासाठी जिब्रानचा विचार कधी झालाच नाही, पण याचा विचार जिब्रानला कधी शिवलाच नाही. खरोखरीच ग्रेट!

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply