Featured Posts
Recent Articles

इतिहास

पूर्वपीठिका : महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्राचीन व ऐतिहासिक गौरवशाली परंपरा; संयुक्त महाराष्ट्रासाठीचा प्रेरणादायी लढा आणि राज्यस्थापनेपासून ते आजपर्यंत झालेली वाटचाल - याचा हा आढावा !

प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्राचा इतिहास आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस ‘दक्षिणापथ’ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे. या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘माहाराष्ट्र’ असे म्हणवून घेतले आहे. पुढच्या कालखंडात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगतात. 

महाराष्ट्र या नावाबरोबरच महाराष्ट्रातील आद्य मानववस्तीचा शोध आपण घेतला, तर आपणास नव्या संशोधनपद्धतीनुसार मिळालेली माहिती आश्र्चर्यकारक असल्याचे दिसते. नासिक, जोर्वे, नेवासे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, दायमाबाद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणच्या उत्खननांमधून व अत्याधुनिक अशा ‘कार्बन-१४’ पद्धतीनुसार पुरातत्त्ववेत्यांनी महाराष्ट्रातील आद्य-मानवाचा कालखंड इ.स. पूर्वी सुमारे ५ लक्ष ते ३० लक्ष वर्षे मानला आहे. उपरोक्त व नद्यांच्या काठी झालेल्या उत्खननांतून असा निष्कर्ष इतिहासतज्ज्ञांनी काढला आहे की, आदि-अश्मयुगीन मानव महाराष्ट्रात एक ते दीड लाख वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या परिसरात वावरत असावा. पुढे वसाहती वाढत गेल्या. महाराष्ट्रात बाहेरुन-विशेषत: उत्तरेतून राजांचे प्रतिनिधी म्हणून लष्करी वेशाचे लोक येऊ लागले. मूळचे नागरिक आणि बाहेरुन आलेले यांच्यात सुरुवातीला संघर्ष व नंतर समन्वय झाला.
वरील कालखंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे आपण वळलो, तर आपणास महाराष्ट्रातील ठळक जाणवणार्‍या सत्ता पुढीलप्रमाणे दिसतात. सातवाहन घराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाकटकांचा विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, चालुक्यांच्या घराण्यातील श्रेष्ठ असा सत्याश्री पुलकेशी, विक्रमादित्य, राष्ट्रकुटांपैकी मानांक, दंतिदुर्ग, प्रथम कृष्ण, ध्रुवराज, गोमंतकातील कदंब घराण्यातील अनंतदेव, अपरादित्य, मध्ययुगीन अशा यादव घराण्यातील द्रुढव्रत, भिल्लम, रामदेवराय या राजांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. या राजांच्या ऐतिहासिक योगदानाला तोड नाही. येथपर्यंत आपण प्राचीन महाराष्ट्राचा अगदी धावता आढावा घेतला आहे.

मध्ययुगीन महाराष्ट्र :
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आपणास रामदेवराय यादव यांच्या कालखंडापासून करावी लागते. दिल्लीचा खलजी सुलतान अलाउद्दिन खलजी याने यादवांच्या अफाट संपत्तीविषयी ऐकले होते. ही संपत्ती लुटणे, आपल्या सत्तेची दक्षिणेत ठाणी उभारणे, सत्तेचा विस्तार करणे या कारणांसाठी अलाउद्दिनने महाराष्ट्रातील यादव सत्तेच्या प्रमुख केंद्रावर म्हणजे देवगिरीवर (सध्याचे दौलताबाद) हल्ला केला. राजा रामचंद्र यादव याच्याकडून अलाउद्दिनला फारसा तिखट प्रतिकार झाला नाही. यादवांनी पुढे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच अलाउद्दिनचा सेनापती मलिक काफूरने यादवांचा वेळोवेळी पराभव केला. रामदेवराव उर्फ राजा रामचंद्रनंतर त्यांचा मुलगा शंकरदेव व जावई हरपालदेव हे यादव सत्तेचे प्रमुख झाले परंतु या दोघांनाही महाराष्ट्राला लागलेले परकीय सत्तेचे ग्रहण संपविता आले नाही. दक्षिणेवर आक्रमण करणारा पहिला सुलतान म्हणून अलाउद्दिनचे नाव इतिहासात अजरामर झाले. संपूर्ण यादव राज्याचा नाश इ. स. १३१८ च्या सुमारास झाला. म्हणजे आजपासून (२००८ पासून) बरोबर ६९० वर्षांपूर्वी हे रामायण घडले. खलजीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने काय प्रतिक्रिया दिली याचे पुरावे इतिहासाला अज्ञात आहेत. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याइतपत इतिहासलेखनाचा प्रवास प्रगल्भ व्हायचा होता. त्यामुळेच या कालखंडातील इतिहासात सर्वसामान्यांचा आवाज दबला गेला आहे आणि दाबला गेला आहे.

खलजींचे दिल्लीतील राज्य संपुष्टात आल्यानंतर तुघलकांचे राज्य दिल्लीवर सुरू झाले. परंतु त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खलजींसारखाच होता. तुघलक घराण्यातील महंमद तुघलकाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. दिल्लीत राहून दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि दिल्लीला परकीय आक्रमकांचा धोका आहे या कारणांमुळे महंमद तुघलक याने दिल्लीतून राजधानी स्थलांतरीत करण्याचा निश्चय केला. ती राजधानी दौलताबादला आणली. या प्रवासात शेकडो लोक ठार झाले. राजधानी - बदलाचा हा प्रयोग महाराष्ट्रात अभिनव होता. महंमद तुघलकाला महाराष्ट्रात- विशेषत: दौलताबादला- आल्यावर जाणवले की, जलद दळणवळणाच्या साधनांच्या अभावी दक्षिण आणि उत्तर भारतावर वर्चस्व ठेवणे अवघड आहे. याच काळात उत्तरेत बंड झाले. महंमदाच्या तख्तला हादरे बसू लागले त्यामुळे दौलताबादची औट घटकेची राजधानी परत दिल्लीला गेली. तुघलक दिल्लीच्या परतीच्या वाटेवर असतानाच दक्षिणेत बंड व्हायला सुरुवात झाली. तुघलकाने दक्षिणेतील असंतोषाचा सामना करण्यासाठी आपले काही सरदार पाठविले परंतु ते अपयशी ठरले. येथील बंडखोर मुसलमान सरदारांनी दिल्लीचा दक्षिणेचा सुभेदार निजामुद्दिन यास महाराष्ट्रात कैद केले. बंडखोर सरदारांचा नेता ‘इस्माईल मख’ याने स्वत:ला ‘नासिरुद्दीनशाह’ पदवी घेतली आणि दौलताबाद येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. येथेच महाराष्ट्रातील स्थानिक व एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या पुनरुज्जीवनाची शक्यता संपुष्टात आली. दक्षिणेतील संभाव्य धोका ओळखून तुघलक स्वत:च मोठे सैन्य घेऊन दौलताबादच्या दिशेने येऊ लागला. ही बातमी समजताच इस्माईल मख उर्फ नसिरुद्दीनशाह राज्य सोडून पळून गेला. या घडामोडी घडत असतानाच गुजरातमध्ये बंड झाले म्हणून तुघलकला तिकडे जावे लागले. त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांकडे दक्षिणेतील मोहिमेची सूत्रे दिली. परंतु ‘नासिरुद्दीनशाह’ च्या बंडखोर सैन्याने तुघलकच्या सैन्याचा पराभव केला.
त्यामुळे महाराष्ट्रात ‘नासिरुद्दीनशाह’ चा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. तो वयोवृद्ध झाल्याने त्याने आपला सहकारी ‘अलाउद्दीन हसन’ याच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट,१३४७ रोजी घडली. या अलाउद्दीन हसनचे पूर्ण नाव अलाउद्दीन हसन गंगू बहमनी होते. त्याने व त्याच्या मुलाने पाडलेल्या नाण्यांवर बहमनशाह अशी उपाधी लावून घेतली आहे. यावरून त्यांच्या घराण्याला ‘बहमनी’ नाव पडले. इ. स. १३४७ ते १५३८ अशी १९० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द या घराण्याला मिळाली. एकंदर १८ राजे या घराण्यात झाले. या १८ राजांपैकी आठ कर्तबगार निघाले, तिघांचा खून झाला, दोघांना आंधळे करण्यात आले. एक अल्पायुषी ठरला तर शेवटचे चार नामधारी राजे झाले. सोळाव्या शतकाच्या पहिल्या १-२ दशकातच बहमनी राज्याची पाच शकले झाली. यातून बीदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वर्‍हाडमध्ये एलिचपूर येथे इमादशाही, गोवळकोंडा येथे कुत्बशाही (किंवा कुतुबशाही) अशा पाच शाही निर्माण झाल्या.
अलाउद्दीन हसनचा समकालीन राजा अलीखान फारुकी याने खानदेशातील थाळनेर येथे फारुकी वंशाचे राज्य स्थापन केले. बागलाण प्रदेशात राठोडांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा रीतीने महाराष्ट्राची विभागणी या सत्तांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात केली. यातील इमादशाहीचा शेवट सम्राट अकबराने २० वर्षांच्या आत घडवून आणला. अकबरानेच फारुकी सल्तनतला शेवटच्या घटका मोजायला लावल्या. पुढे बरीदशाही संपली. निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही मुघलांनी संपुष्टात आणल्या. २०० वर्षांपेक्षा जास्त एकही सत्ता टिकली नाही. या  शाहींनी स्वत:च्या सत्तेचे वर्चस्व टिकवून धरण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन बहुजन समाजाला हाताशी धरले. बहुविध जातींमधील लोक पुढे यायला लागले. स्वकर्तृत्वावर ते पुढे जाऊ लागले. येथील सुलतानांना याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच स्वराज्याची पार्श्र्वभूमी तयार झाली. हे सगळे होत असताना राज्यकर्त्यांच्या धर्माचा प्रभाव, संस्कृतीचा प्रभाव येथील लोकजीवनावर पडला. जीवनाचे एकही क्षेत्र असे नव्हते की, जेथे राज्यकर्त्यांचा प्रभाव नव्हता. या सगळ्याला छेद देऊन ‘महाराष्ट्र धर्म’ जागविण्याचे प्रयत्न केले ते महाराष्ट्रीय संतांनी!
संतांची कामगिरी -
‘मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या  ग्रंथात न्या. महादेव गोविंद रानडे यांनी संतांच्या भूमिकेविषयी पुढील भाष्य केले आहे. ‘‘जातीजातीतील विषमता कमी करून संतांनी महाराष्ट्राची भूमी ऐक्यभावनेने नांगरून तयार केली. त्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यात स्वातंत्र्याचे बी पेरणे शक्य झाले.’’ खरं म्हणजे महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व देशी भाषेतील विचारधन यांची निर्मिती संतांनी प्रवर्तित केलेल्या भक्तिपंथाकडूनच झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठी संत हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रमुख शिल्पकार ठरतात. धर्माचे रहस्य समजावून देऊन संतांनी उच्च व उदात्त विचार, कृती यांवर भर दिला. महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय तेराव्या शतकात झाला. या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात लोकभाषांमधून भक्तिमार्गाचा प्रसार करणारे भागवतधर्मीय संत पुढे आले. परमेश्र्वरप्राप्तीसाठी उत्कट भक्तीखेरीज दुसर्‍या कशाचीच जरुरी नाही, त्यामुळे कुलजातिवर्णादी विषमतेला, स्त्री-पुरुष भेदाला किंवा विद्या, धन, प्रतिष्ठा इत्यादींमुळे प्राप्त होणार्‍या अधिकारभेदाला भागवतधर्मात बिलकुल थारा नाही, असे प्रतिपादन संतांनी केले. नाथपंथ, महानुभाव, वारकरी पंथ यांनी महाराष्ट्राला जागे केले. संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत रोहिदास व कनकदास, कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा आदी संतांनी महाराष्ट्रात लोकजागृती केली.

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज :
बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.
प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.
शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले. 

शिवोत्तर कालखंड :

छत्रपती संभाजी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म दिनांक १४ मे, १६५७ रोजी पुरंदरवर झाला. त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाल्याने आजी जिजाऊसाहेबांनी त्यांस वाढविले. आग्रा प्रकरणात संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी संभाजी राजांस युवराजपदाचा मान देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले. त्यांना आयुष्यात एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. मुघल सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर मराठ्यांकडे सहकार्याच्या अपेक्षेने बंड करून आला असता महाराजांनी त्यास मदत केली. आपल्या तलवारीचे पाणी त्यांनी सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशहा, मुघल यांना पाजले. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब स्वत: दक्षिणेत उतरला. त्याने आदिलशाही-कुतुबशाही नष्ट केली. संपूर्ण भारतात त्याला आता एकच शत्रू उरला होता, तो म्हणजे मराठे! औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने दिनांक १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्र्वर मुक्कामी छत्रपती संभाजी राजांस पकडले. छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. आग्रा येथून सुटका करून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबास डोईजड झाले होते. त्याप्रमाणेच,  मागील इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको व अन्य दोन शाहींप्रमाणेच  मराठ्यांचाही नाश करावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांस ठार मारले. छत्रपती संभाजीराजांस हालहाल करून ठार मारले, ही बातमी कळताच मराठे राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आणि त्यांनी अविरत संघर्ष सुरू केला.
छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई -
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजारामांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी झाला. १२ फेब्रुवारी, १६८९ रोजी ते मराठी राज्याचे छत्रपती झाले. ते रायगड किल्ल्यात मुक्कामी असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजारामांव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे व त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई होत्या. त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले. त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील अन्य मंडळींना कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एक असमान लढा सुरू झाला. औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हा याचा अर्थ राज्याचा आधार) यांनी महाराष्ट्र लढत ठेवला. जिंजीच्या किल्ल्यात छत्रपती राजाराम महाराज असताना झुल्फिकारखानाने त्या किल्ल्याला वेढा दिला. पुन्हा एकदा त्या किल्ल्यातूनही स्वत:ची सुटका करून घेऊन  महाराज महाराष्ट्रात परतले. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण युद्ध जिंकू शकत नव्हता. अशा धामधुमीच्या प्रसंगात छत्रपती राजाराम महाराजांचे दिनांक ३ मार्च, १७०० रोजी निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते.  आता मराठी राज्याची अवस्था विचित्र झाली. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. या वेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. औरंगजेबाच्या प्रत्येक कृतीस महाराणी ताराबाईंनी प्रतिउत्तर दिले. महाराष्ट्रात मुघलांच्या विरुद्ध एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढा सुरू केला. औरंगजेब समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांचे किल्ले घेऊ शकत नव्हता म्हणून त्याने पैसे देऊन किल्ले घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट अत्यंत निराश अवस्थेत दिनांक २० फेब्रुवारी, १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट!
कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक‘माचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
‘‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळा।।’’

सर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी राज्यात फूट पाडण्यासाठी औरंगजेबाचा मुलगा आज्जमशाहने मुघलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची ८ मे, १७०७ रोजी सुटका केली. शाहूराजे स्वराज्यात दाखल होताच अनेक मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला. खेडच्या लढाईत महाराणी ताराबाईंचा पराभव करून शाहू राजांनी दिनांक १२ जानेवारी, १७०८ रोजी सातारा येथे स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला. 

पेशवे काळ :
धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्‍यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले. त्यांनी बादशहाकडून छत्रपतींच्या नावे स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. पेशव्यांनी मुघलांच्या कैदेतून छत्रपतींच्या मातोश्री येसूबाईंची सुटका केली. या सनदांमुळे दक्षिणेतील सहा मुघल सुभ्यांमध्ये चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. छत्रपतींचे पूर्वार्धातील आयुष्य मुघलांच्या कैदेत गेल्यामुळे ‘त्यांनी आपणास जिवंत ठेवले व वेळ येताच सोडले’ या गोष्टीचा छत्रपतींच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी ‘‘दिल्लीची पातशाही रक्षून राज्यविस्तार साधावा’’ असा सल्ला पेशव्यांना दिला.

बाळाजी विश्वनाथांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी मराठा मंडळ अर्थात संयुक्त राज्यव्यवस्थेची निर्मिती केली. या योजनेनुसार मराठा सरदारांना त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात मर्यादित स्वायत्तता देण्यात आली व स्वराज्याचा चौफेर विस्तार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा या अतुल पराक्रमी सेवकाचा मृत्यू सासवडला दिनांक २ एप्रिल, १७२० रोजी झाला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव हे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. ते वडिलांच्या तालमीत तयार झाले होते. हे पेशवे आयुष्यात कधीही रणांगणावर पराभूत झाले नाहीत. त्या अर्थाने ते अजेय होते व मराठी सत्तेचे विस्तारक होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, छत्रसाल राजाची संकटातून मुक्तता केली. बंडखोर मराठे सरदारांचा बंदोबस्त केला. सिद्दी-पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली भागात भीमथडीची तट्टे नेली. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ अशी मराठी माणसाला अनुभूती दिली. गतिरुद्ध समाज आपसात संघर्ष करून संपतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी सरदारांच्या पराक्रमाला पेशव्यांनी आणि छत्रपतींनी नवे क्षितीज उपलब्ध करून दिले. या पेशव्यांच्या काळात दक्षिणाभिमुख असणारे मराठे ‘उत्तराभिमुख’ झाले. त्यामुळेच शनिवारवाड्याचे तोंड उत्तराभिमुख आहे. औरंगजेबाच्या मृत्यूने भारताच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती मराठ्यांनी भरून काढली. अशा या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू १७४० मध्ये झाला.

त्यांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. दुर्दैवाने या पेशव्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विनाशाची अकाली बीजे पेरली. इंग्रजांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा त्यांनी इंग्रजांच्या मदतीने पूर्ण नाश केला. माळवा, राजपुताना भागातील हिंदू राज्यकर्त्यांना अकारण दुखविले. नागपूरकर भोसल्यांशी तंटा केला. पानिपतच्या स्वारीवर स्वत: जाऊन नेतृत्व करण्याऐवजी विश्वासराव, सदाशिवराव पेशव्यांना पाठवून स्वत:चा पराभव ओढवून आणला. अहमदशाह अब्दाली याने दिल्लीवर स्वारी केली असता, ‘हिंदुस्थान आमचा आहे आणि आम्ही तो सांभाळणारच’ या एकमेव उद्देशाने भारतातील एकमेव सत्ता लढली ती म्हणजे मराठ्यांची! पानिपतावरील पराभवाचा आघात नानासाहेब सोसू शकले नाहीत, त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले. १७६१ ते १७७२ इतकाच कालखंड या पेशव्याच्या वाट्याला आला. या पेशव्यांनी पानिपतच्या आघाताने मोडून पडलेली मराठी सत्ता सावरून धरली. शिंदे-होळकरांच्या कर्तृत्वास वाव दिला. काका रघुनाथराव पेशवे व जानोजी भोसले, हैदर आणि निजाम यांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी लगाम घातला. १७७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना मूल नसल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव गादीवर बसले. त्यांच्या निमित्ताने मराठ्यांचे सत्ताकारण ज्या गोष्टीपासून मुक्त होते त्या गोष्टी - म्हणजे खून व रक्तपात - घडण्यास सुरुवात झाली.
नारायणरावांचे काका रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या मोहाने गारद्यांच्या साहाय्याने नारायणरावांस ठार मारून पेशवेपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना राज्यात विरोध असल्याने नारायणरावांचे सुपुत्र सवाई माधवराव पेशवे यांस वयाच्या ४० व्या दिवशी पेशवेपदाची वस्त्रे देण्यात आली. सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी (नाना फडणीस, हरिपंत फडके, सखरामबापू बोकील, त्रंबकराव पेठे, मोरोबा फडणीस, बापूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी, रास्ते, पटवर्धन, महादजी शिंदे, तुकोजी होळकर) कारभार पाहण्यास सुरुवात केली. नाना फडणीसांनी दक्षिण तर महादजींनी उत्तर सांभाळण्याचे ठरले परंतु १७९३ मध्ये शिंदे निधन पावले. १७९५ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आत्महत्या केली. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र दुसरे बाजीराव पेशवे १७९६ मध्ये पेशवे झाले ते १८१८ पर्यंत. २२ वर्षे पेशवेपद त्यांच्यापूर्वी कोणालाच मिळले नव्हते. १८०० मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला. शिंदे व होळकर यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला. १८०२ मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांबरोबर करार करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली.

इंग्रज-मराठे यांच्यात ३ युद्धे झाली, परंतु मराठ्यांच्या सत्तेचा नाश इंग्रजांनी घडवून आणला. मराठे हरले कारण ते प्रगत व विकसित होत चाललेल्या भौतिक संस्कृतीच्या प्रतिनिधींबरोबर १६-१७ व्या शतकात रेंगाळणार्‍या मनोवृत्तीने लढत होते. इंग्रज तोफा, बंदुका घेऊन लढत होते, तर मराठे ढाल-तलवार, भाले घेऊन लढत होते. इंग्रजांना औद्योगिक क्रांतीचे साहाय्य झाले. ‘ज्याचे हत्यार श्रेष्ठ, त्याची संस्कृती श्रेष्ठ’ हे मराठे विसरले. देशाभिमानाचा अभाव, ना धड उत्तर ताब्यात ना दक्षिण, प्रगत दळणवळण व्यवस्थेचा अभाव, सैन्यात शिस्त नाही, दिल्लीच्या गादीवर बसण्याची कुवत असूनही न दाखविलेली धमक, कार्यक्षम हेर यंत्रणेचा अभाव, कायमस्वरूपी कर्जे अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. लुटालुटीने फार तर वेळा भागविल्या जातात, कायमची सोय होत नाही याचा मराठ्यांना विसर पडला म्हणून मराठे हरले. मराठ्यांनी  केलेल्या चुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अंतिमत: पराभव स्वीकारावा लागला. 

स्वातंत्र्यचळवळ :

ईस्ट इंडिया कंपनी -
दिनांक ३१ डिसेंबर, १६०० रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात ‘तराजू-तलवार-तख्त असा प्रवास केला. भारतात पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थायिक झाली, तर कंपनीने मुघल साम्राज्यातील प्रदेशात स्वत:चे बस्तान बसविले. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगालची राजकन्या कॅथेरिन ब्रॅगांझा हिच्याशी झाले, तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बंदर  इंग्रजांना हुंडा म्हणून दिले. हा सारा प्रकार म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होते. मुंबई बंदराचा फायदा घेऊन १८१८ ते १८५७ या कालखंडात कंपनीने आपली सत्ता झपाट्याने महाराष्ट्रात पसरविली. सातारच्या प्रतापसिंह महाराजांना फसवून त्यांच्या अंमलाखाली असणारी संस्थाने कंपनीने ताब्यात घेतली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर धोरण राबवून संस्थाने ताब्यात घेतली. एलफिन्स्टनने अत्यंत कुशलतेने मुंबई इलाखा जिंकला. ‘कारकून ते जिल्हाधिकारी’ अशा प्रकारची प्रशासन व्यवस्था एलफिन्स्टनने तयार केली.

१८५० मध्ये लोकांचा कारभारात समावेश असावा म्हणून नगरपालिका निर्माण करण्यात आल्या. कंपनीने १८६१ पासून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमून महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी निर्माण केली. १८९४ मध्ये तुरुंग कायदे येथे आले. ‘कायद्यासमोर सारे भारतीय समान’ अशी इंग्रजांची भूमिका होती. १८३३ मध्ये कायदा आयोग आला व १८३७ मध्ये येथे ‘पीनल कोड’ (दंडसंहिता) लागू करण्यात आला. यातून उतरंड असणारी खर्चिक न्यायालय व्यवस्था उदयाला आली. दिनांक १४ ऑगस्ट, १८६२ रोजी मुंबई हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. भारतीय लोकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यावर बंदी घालण्यात आल्याने महाराष्ट्रातील सरदारांच्या तलवारींच्या विळ्या झाल्या. १८५७ च्या अगोदरच येथे पोस्ट व तारयंत्र सुरू झाले. १८६५ पासून गॅझेटियर तयार करण्याचे कार्य आणि १८७१ पासून जनगणना करण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात रयतवारी, कायमधारा व अन्य महसूलपद्धती इंग्रजांनी आणल्या. इनाम कमिशन नेमून महाराष्ट्रातील ३२ हजार इनामांची चौकशी करून २१ हजार वतने पुरावा नसल्याने जप्त केली, तर काही वतनांची कागदपत्रे जाळून टाकली. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर ब्रिटिशांना महाराष्ट्रात पुढील असंतोषास तोंड द्यावे लागले.

१८१८ मध्ये खानदेशातील भिल्लानी गोदाजी डेंगळे आणि महिपा डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बीडच्या धर्माजी प्रतापरावांचे बंड (१८१८), नांदेडमधील हंसाजी नाईक हटकर यांचा उठाव (१८१९-२०), चितूरसिंग, सत्तू नाईक, उमाजी नाईक यांचा सशस्त्र लढा (१८२६-३१), सावंतवाडीकरांचा लढा (१८२८-३८), कोल्हापूरच्या गडकर्‍यांचा उठाव (१८४४) - महाराष्ट्रात असे अनेक उठाव झाले. परंतु इंग्रजांनी हे उठाव मोडून काढले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात कोल्हापूर, सातारा, मुंबई, खानदेश, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुधोळ येथील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. परंतु नानासाहेब उर्फ धोंडोपंत पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे यांस अपयश आले आणि १८५७ चा लढा अयशस्वी ठरला.

१८७४-७८ या कालखंडात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अन्याय करणार्‍या सावकारांविरुद्ध स्थानिक जनतेने जी बंडे केली ती दख्खन दंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आणण्याच्या विचाराने प्रवृत्त झालेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५-१८८३) यांना इंग्रज सरकारने एडनच्या तुरुंगात मृत्यूपर्यंत ठेवले. या सगळ्यातून महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात आले की आपण ब्रिटिशांविरुद्ध प्रदीर्घ काळ केवळ संघर्ष करू शकत नाही. यातून राजकीय संस्थांचा उदय झाला. ‘हिंदी राजकारणाचा पाया घालण्याचे काम’ करणारी बॉम्बे असोसिएशन दिनांक २६ ऑगस्ट, १८५२ रोजी मुंबईत जन्माला आली. जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी हे संस्थापक. या संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतीयांच्या अडचणी राज्यकर्त्यांच्या कानी घालणे व त्यांचे निराकरण करणे हा होय. याचा पुढचा मैलाचा दगड म्हणजे सार्वजनिक सभा होय. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या सभेने मिठाच्या जाचक प्रश्नावर आंदोलन केले. तसेच मॉरिशसमधील भारतीयांस मदत, दक्षिणेतील शेतकर्‍यांचा कायदा करणे, दुष्काळ समिती, मुद्रणस्वातंत्र्य, स्वदेशी, फेमिन कोडचे भाषांतर या क्षेत्रांत प्रभावी कार्य केले. यामुळेच अखिल भारतीय काँग्रेस संघटनेच्या स्थापनेची पार्श्र्वभूमी तयार झाली. काँग्रेस या शब्दाचा अर्थच मुळी एकत्र येणे! २८ डिसेंबर, १८८५ रोजी काँग्रेसचे १ले अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात भरले. यास उपस्थित असणार्‍या ७२ प्रतिनिधींपैकी मुंबई इलाख्यातील ३८ जण हाते. काँग्रेसच्या कार्यात सुरुवातीला महाराष्ट्रातील दादाभाई नौरोजी, न्या. म. गो. रानडे, फिरोजशहा मेहता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा समावेश होता.
टिळकयुग :
पुढे लोकमान्य टिळक यांनी त्याग व तुरुंगवास आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या द्वारे अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त केले. केसरीतील लेखन, शिवजयंती, गणेशोत्सव, दुष्काळातील कार्य, गीतारहस्याचे लेखन, डोंगरी-मंडाले येथील तुरुंगवास यांमुळे टिळकांना लोकमान्यत्व आणि अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त झाले. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार यांचा पुरस्कार केला. होमरुल लीगला पाठिंबा दिला. टिळकांच्या काळात चाफेकर बंधूंनी पुण्याचा ‘प्लेग कमिशनर’ रँड याची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०४ मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेची पारतंत्र्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी स्थापना केली. सावरकरांच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीवर गोळ्या झाडल्या. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनवर क्रांतिकारक अनंत कान्हेरेंनी गोळ्या झाडल्या. सेनापती पांडुरंग महादेव बापट बॉम्बचे प्रशिक्षण घेण्यास विलायतेला गेले. सावरकरांवर खटला भरून सरकारने त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्यावर पाठवले. विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा शिवराम हरि राजगुरु, बाबू गेनू, हुतात्मा शिरीषकुमार यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि टिळक युगाचा अंत झाला. लोकमान्य टिळक यांच्या काळात ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष आणि राष्ट्रवाद यांचा संपूर्ण भारतात प्रसार झाला.
महात्मा गांधी युग :
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ३१ ऑक्टोबर, १९२० रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियनचे (आयटक) पहिले अधिवेशन मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरले. १९२० च्या काँग्रेच्या नागपूर अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. याच ठिकाणी महात्मा गांधींनी ‘एक वर्षात स्वराज्य’ अशी घोषणा केली. १९२१ मध्ये महाराष्ट्रातील विविध संस्थानांमधील प्रजेच्या हितासाठी ‘दक्षिणी संस्थान हितवर्धक सभा स्थापण्यात आली. याच वेळी इंग्लंडचे युवराज मुंबईला येणार असल्याचे वृत्त येताच त्या विरोधात वातावरण तयार झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापून आपले कार्य पुढे चालू ठेवले. मुंबईत श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशनला मराठी हिसका दाखविण्यात आला. महात्मा गांधी यांच्या मीठ सत्याग्रहाचे महाराष्ट्रात शिरोडा, कोकण, अकोला येथे पडसाद उमटले. सोलापुरात ब्रिटिश विरोधी वातावरण जबरदस्त असल्याने तेथे ४९ दिवस मार्शल लॉ लागू करण्यात आला. मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चौघांना सरकारने फाशीची शिक्षा ठोठावली. महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत विदर्भात जंगल सत्याग्रह, सातारा जिल्ह्यातील बिळाशी सत्याग्रह, नाशिक, रायगड येथे सत्याग्रह झाले. काँग्रेसचे खेड्यात भरविले जाणारे पहिले अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे घेण्यात आले. १९३५ च्या कायद्यानुसार भारतात प्रथमच निवडणुका झाल्या. मुंबई इलाख्याचे पंतप्रधान बाळासाहेब खेर झाले. या सरकारने जमीन महसूल सूट, खेड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रौढ शिक्षण, दारुबंदी, राजबंद्यांची सुटका या क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली. याच दरम्यान कोल्हापुरात भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रजापरिषद चळवळ वाढली. १९४० मध्ये महात्माजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. त्याचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. १९४२ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत पं. नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले. येथेच ‘छोडो भारत आणि चले जाव’ चा नारा प्रकटला. चंद्रपूर, रायगड, अहमदनगर, सातारा येथे जबरदस्त आंदोलने झाली. मुंबईत सरकारी यंत्रणेला समांतर असे गुप्त आकशवाणी केंद्र - आझाद रेडिओ -स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांनी चालविले. सातार्‍याच्या प्रतिसरकारने (पत्रीसरकारने) अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या काळात अतुलनीय कार्य केले. १९४६ मध्ये मुंबईत सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.
स्वातंत्र्य :
दिनांक १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला आणि पुण्यातल्या शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक कायमचा खाली आला. भारत स्वतंत्र झाला, तरी संस्थानांचा प्रश्र्न कायम होता. कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात सामील झाले. मराठवाड्याचा प्रश्न कायम होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसच्या माध्यमातून चळवळ उभारली. सरदार पटेलांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी सैन्य हैद्राबादेत घुसवले. मराठवाडा भाग मुंबई इलाख्याला जोडला. परंतु भारत स्वतंत्र झाला तरी संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अपुरे होते.


संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.
पार्श्र्वभूमी :
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची सांधेजोड करून राष्ट्रीय शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज प्रतिपादन केली. याच काळातील लोकशाही स्वराज्य पक्षाच्या (काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी) उद्देशपत्रिकेत व पक्षाच्या कार्यक्रमात भाषावार प्रांतरचनेचा आगह धरला व महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषी प्रांत व्हावा अशी घोषणा केली. १९१७ च्या कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. पट्टभी सीतारामय्या यांनी आंध प्रांत स्वतंत्र करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला अॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय, म. गांधी यांनी विरोध केला, तर लो. टिळक यांनी पाठिंबा दिला. म. गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्यावर १९२१ च्या नागपूर अधिवेशनात म. गांधी यांनीच ‘भाषावार प्रांतरचनेचा’ ठराव मांडला. कॉंग्रेसची फेर उभारणी भाषा तत्त्वावर केली यामुळे कॉंग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. १९२८ मध्ये कामकरी शेतकरी पक्षाने पं. मोतीलाल नेहरू कमिटीसमोर भाषावार राज्याची मागणी करून महाराष्ट्राची मागणी पुढे केली. नेहरू कमिशननेसुद्धा भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केली.

१५ ऑक्टोबर, १९३८ रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘वर्‍हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत’ असा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. कारण ‘सी. पी. अँड बेरार’ प्रांतातून वर्‍हाड वगळून त्याचा स्वतंत्र विदर्भ प्रांत करण्यात यावा अशी शिफारस मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल यांनी केली होती. १९३९ च्या नगरच्या साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा’ प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल, त्याला ‘संयुक्त महाराष्ट्र’ असे नाव द्यावे असा ठराव झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग येथपासून वापरात आला. ‘सी.पी.अँड बेरार’ प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी ‘वर्‍हाड’ च्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ स्थापली. १९४१ मध्ये पुण्यात डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली  ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ स्थापण्यात आली.
बेळगांव साहित्य संमेलन -
दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत - वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.

महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने  द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.
दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.

ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले.

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud