Featured Posts
Recent Articles

महाराष्ट्रातील अभयारण्ये - संरक्षित वने

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर - (ताडोबा - अंधारी प्रकल्प)
ताडोबा येथील दाट जंगल १९५५ मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात ते आहे. नागपूरपासून १५४ कि. मी. अंतरावर असलेल्या ताडोबाच्या जंगलात अगदी मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे.  साग, मोह, निलगिरी अशी झाडे या सुमारे ११६ चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात आहेत. तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे २५० प्रकारचे पक्षीही आढळतात. येथील ‘मगर पालन’ केंद्र हे आशिया खंडातील उल्लेखनीय केंद्र आहे. सुंदर झोपडीतील वन्यप्राणी संग्रहालय, तेथील प्राण्यांचे सांगाडे, पक्षांची घरटी हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान व जोडूनच असलेले अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही प्रकल्पांना एकत्रितपणे ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्प असे म्हटले जाते. स्थानिक आदिवासी देव तारू किंवा तारोबा यावरून ताडोबा हे नाव रूढ झाले, अन्‌ जंगलातून अंधारी नदी वाहते त्यावरून अभयारण्यास नाव देण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानास ‘विदर्भाचे रत्न’ असे म्हटले जाते.
पेंच प्रकल्प, नागपूर -
नागपूरपासून उत्तरेला सुमारे ८० कि. मी. अंतरावर पेंच भाग येतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेलगतचा हा भाग आहे. पेंच अभयारण्याचा मोठा भाग मध्य प्रदेशात मोडतो. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये या भागास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला, तसेच १९९९ मध्ये या प्रकल्पास ‘व्याघ्र प्रकल्पाचा’ दर्जा देण्यात आला. कालिदासाच्या मेघदूत व शाकुंतल या काव्यांत या निसर्गसुंदर भागाचे वर्णन आढळते. या जंगलात ३३ सस्तन प्राणी प्रजाती, ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १६४ प्रजातींचे पक्षी, ५० जातींचे मासे व १० प्रकारचे उभयचर प्राणी वास्तव्यास आहेत.

पेंच नावाच्या नदीमुळे या भागाला पेंच नाव पडले असावे. वाघ, बिबळ्या, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, निलगाय, माकड, इ. प्राणी या अभयारण्यात आढळतात. भरपूर सागाची झाडे असलेले हे जंगल असून पेंच अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीतच अभयारण्यात खुला प्रवेश असतो. जुलै ते सप्टेंबर या अति पावसाच्या काळात येथे प्रवेश दिला जात नाही.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई. -
मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली येथील परिसरात - मुंबई व ठाणे शहरांसाठी जणू फुफुसांचे काम करणारे - हे राष्ट्रीय उद्यान / अभयारण्य आहे. या भागाला कृष्णगिरी उद्यान असेही म्हटले जाते. १९७४ मध्ये हे ‘अभयारण्य’ घोषित करण्यात आले.

येथील दाट जंगलात कान्हेरी गुंफामध्ये बौद्ध लेणी कोरलेली आढळतात. जंगलची सफर घडवणारी रेल्वे येथे असून त्यातून आपण वनजीवनाचा आनंद घेऊ शकतो. सुमारे १०४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात चितळ, भेकर, सांबर  हे प्राणी आढळतात, तसेच सुमारे २५० जातींचे पक्षीही येथे आढळतात. मुंबईपासून जवळ असल्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची कायम गर्दी असते.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया -
२२ नोव्हेंबर, १९७५ या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले हे घनदाट जंगल महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. नवेगाव तलावाभोवती लहान टेकड्यानी हे राष्ट्रीय उद्यान वेढलेले आहे. वाघ, बिबळ्या, सांबर, हरीण, चितळ, नीलगाय, अस्वल असे प्राणी येथील जंगलात दिसतात. तर पक्षीही भरपूर दिसतात. तलावामुळे पाण्याजवळ असणारे निरनिराळे पक्षी नेहमी येतात.

येथील पक्षी अभयारण्यास डॉ. सलीम अली पक्षी अभरायण्य असे म्हटले जाते. राज्यातील एकूण पक्षांच्या प्रजातींपैकी सुमारे ६०% प्रजाती आपणास येथे पाहण्यास मिळू शकतात. हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात असून सुमारे १४० चौ. कि. मी. परिसरात पसरलेले आहे. खुद्द नवेगाव बांध हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव असून त्याचे क्षेत्र सुमारे ११ चौ. कि. मी. आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे.
नागझिरा अभयारण्य, गोंदिया -
१९७०-७१ मध्ये घोषित केलेले हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्याच्या परिसरात आहे. मोठे वृक्ष, वेली, वनौषधी या जंगलात सापडतात. वाघ, लांडगा, रानमांजर, उदमांजर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, बिबळ्या, चिंकारा, रानकुत्रे (जंगली कुत्री) तरस असे एकूण ३५ प्रजातींचे प्राणी या जंगलात आहेत. तसेच येथे सरपटणारे प्राणी (३४ प्रजाती) आणि विविध पक्षीही (१६६ प्रजाती) आढळतात. साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. पर्यावरणविषयक जागृती करणारे वस्तुसंग्रहालय देखील येथे पाहण्यास मिळते. तसेच वन्यजीवांचे अवशेष व संबंधित माहितीपटही आपण येथे पाहू शकतो. विदर्भातील हे एक लक्षणीय पर्यटन स्थळ असून याच जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती -
१९६७ साली संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित झालेले मेळघाटचे जंगल १९७४ सालापासून व्याघ‘ प्रकल्पातील जंगल असे घोषित केले गेले आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे या प्रकल्पाचा एक भाग आहे. अमरावती जिल्ह्यात येणार्‍या या भागाला सातपुडा पर्वतरांगा, गाविलगड टेकड्या यांनी वेढले आहे. साग, बांबू, महुआ, ऑर्किडस्, हत्ती लपू शकतील एवढे उंच वाढलेले गवत, अशी वनसंपत्ती येथे आढळते. वाघ, गौर(गवा), नीलगाय, चितळ, संबर, डुक्कर, माकड, शेकरू यांसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. पट्टेरी वाघांसाठी हे विशेष प्रसिद्ध असून, सुमारे ६० वाघ येथे असण्याची शक्यता आहे. सातपुड्याची डोंगररांग व तापी आणि तिच्या उपनद्यांचे खोरे या परिसरात सुमारे १६७७ चौ. कि. मी. क्षेत्रावर हा प्रकल्प पसरलेला आहे. येथे ७०० प्रजातींची झाडे, २५० प्रजातींचे पक्षी, १६० प्रकारचे सरपटणारे प्राणी, २४ प्रकारचे मासे व ४१ प्रजातींचे सस्तन प्राणी आढळतात.
यावल अभयारण्य, जळगाव. -
मार्च, १९६९ मध्ये हे संरक्षित जंगल म्हणून घोषित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल रावेरजवळचे हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे. दाट वाढलेले बांबू, तसेच ऐन, बेल, बाभूळ, आवळा, जांभूळ, साग, तिवस, खैर, चारोळी, जांभूळ, तेंदू, धावडा, शिसम, पळस अशी वनसंपदा या जंगलात आहे.

वाघ, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, शेकरू, सांबर, नीलगाय, रानमांजर, हरीण व मोर हे प्राणी-पक्षी येथे आढळतात. सातपुड्याची उत्तरेकडील रांग व अनेर नदीचे खोरे - यांच्या परिसरात हे जंगल पसरलेले आहे. सुखी किंवा सुकी नावाची नदीही या अभयारण्यातून वाहते. या परिसरात तडवी व पावरा जमातीचे अदिवासी राहतात. यावल तालुक्यातील या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे १७७ चौ. कि. मी. आहे. येथून जवळच पाल हे सातपुड्याच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे.
तानसा अभयारण्य, ठाणे -
फेब्रुवारी, १९७० मध्ये ठाणे जिल्ह्यातील हे जंगल संरक्षित वन म्हणून घोषित केले गेले. शहापूर, खर्डी, वैतरणा, वाडा या वनक्षेत्रातील तानसा तलावाजवळचा भाग म्हणजे हे जंगल होय. मोखाडा, जव्हार, वाडा, शहापूर तालुक्यांनी वेढलेले हे जंगल सुमारे ३२० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या जंगलात साग, खैर, हेड, कदंब, बाबूं, बिब्बा हे वृक्ष भरपूर आढळतात. या क्षेत्रात ५० प्रजातींचे प्राणी आणि २०० जातींचे पक्षी आहेत.

हरीण, तरस, रानडुक्कर, चित्ता, लांडगा, कोल्हा, चितळ, सांबर, ससे, माकडे, चारसिंगा असे प्राणी या अभयारण्यात पाहायला मिळतात. बगळे, खंड्या, गरूड, घार, कोकीळ, बुलबुल आदी पक्षी आढळतात.

मुंबईपासून ९५ कि. मी. अंतरावर असलेल्या या भागात माहूली, सूर्यमाळ हे पठार प्रसिद्ध आहे. जून ते मार्च हा काळ अभयारण्य पाहायला मुद्दाम जाण्यासारखा आहे.
राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर -
डिसेंबर, १९५८ मध्ये जंगली जनावरांची हत्या थांबावी या दृष्टीने हे राधानगरीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्र राज्यातील अगदी सुरुवातीच्या काळात घोषित झालेले हे अभयारण्य आहे. राजर्षी शाहू सागर, लक्ष्मी सागर हे मोठे जलाशय, पश्चिम घाटातील सह्याद्रीची रांग यांच्या सान्निध्यात असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातूनच वाहतात. नंतर कृष्णेला हे सर्व प्रवाह मिळतात.

अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा असे वृक्ष या जंगलात आहेत. बिबळ्या, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, मोठी खार, जंगली कुत्रे, हरीण असे प्राणी बघायला या जंगलात जंगलप्रेमी गर्दी करतात.  हे अभयारण्य खास गव्यांसाठी संरक्षित व प्रसिद्ध आहे.

कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरुडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या परिसरातील या जंगलास दाजीपूर अभयारण्य असे म्हटले जाते. कोल्हापूरपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५१ चौ. कि.मी. आहे.



पर्यटन स्थळे
भीमाशंकर अभयारण्य, पुणे.
पुणे, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य १९८५ साली संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. १३० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्याचे प्रमुख क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव या तालुक्यांत येते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे २५०० फूट उंचीवर आहे.

१२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या महादेवाच्या पवित्र ठिकाणाजवळ हे जंगल आहे. भीमा व घोडनदी या नद्यांचा उगम येथूनच होतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधे असलेल्या दाट झाडीत अनेक वन्य जीवांसोबत कीटक, पक्षीही आढळतात. आदिवासी लोकही या ठिकाणी वास्तव्याला आहेत. प्रामुख्याने महादेव कोळी हे आदिवासी भीमाशंकरजवळ राहतात.

महाराष्ट्रात दुर्मीळ असलेली व महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेली उडणारी खार ‘शेकरू’ येथे आढळते. असंख्य जातीची फुलपाखरे, कीटक, तसेच अनेक पक्षीही बघायला येणारे निसर्गप्रेमी भीमाशंकरला येतात. नागफणी कडा, बॉंबे पॉईंट, हनुमान टँक व गुप्त भीमाशंकर आदी ठिकाणांचा आनंद या जंगलात येणारे पर्यटक घेतात.

आंबा, जांभूळ, बांबू, पळस, बाभूळ, अंजन, बेहेडा, बेल, हिवर, साग, सालई असे वृक्ष जंगलात आहेत. वनौषधी, गवत, नेचाही भरपूर प्रमाणात आहे. या अभयारण्यात हरीण, रानडुक्कर, बिबळ्या, माकड, तरस, सांबर हे वन्यजीव तसेच हॉर्नबील, गरुड इत्यादी प्राणी-पक्षी आढळतात.

उपरोक्त अभयारण्यांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड जिल्हा); रेहेकुरी काळवीट अभयारण्य (अहमदनगर जिल्हा); माळढोक अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर जिल्हा); नांदूर - मधमेश्र्वर अभयारण्य (नाशिक जिल्हा); किनवट अभयारण्य (नांदेड व यवतमाळ जिल्हा); सागरेश्र्वर अभयारण्य (सांगली जिल्हा); बोर अभयारण्य (वर्धा जिल्हा); गवताळा अभयारण्य (औरंगाबाद जिल्हा) व चांदोली अभयारण्य (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा) - आदी अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या वनसंपत्तीचा तेथील पशू-पक्षांचा, प्रदूषणमुक्त हवेचा आनंद मनमुराद लुटत असतात.
ही अभयारण्ये आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वनखात्याची, पर्यटन खात्याची विश्रामगृहांची सोय आहे. काही ठिकाणी पर्यटन आणि वनखात्यानी तयार केलेली संग्रहालयेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक, माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून दिली जाते.

वनखात्याने वन्यजीवांना सुरक्षितता मिळावी, त्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा मानवाला व मानवाचा त्यांना उपद्रवही होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित क्षेत्र आखून दिले आहे. संबंधित नियम पाळून सरकारला साहाय्य केले जावे म्हणून जंगलात जाणार्‍यांसाठी नियमावलीही तयार केली आहे. पर्यटकांना, जंगल प्रेमींना, अभ्यासकांना उपयुक्त अशी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अभयारण्यांची घोषणा ही फारच उपयुक्त असल्याचे लक्षात येते. वृक्षतोडीला आळा घालण्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचीही जपणूक होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा असाही उद्देश साध्य होत आहे. जागरूक नागरिक म्हणून आपलेही सहकार्य व योगदान अपेक्षित आहेच!

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud