हिंम्मत आहे का?

भारतीय नागरिक व भारतीय सेना यांच्या मनात या घटनेने इतका असंतोष पसरला आहे की जर भारतीय सैनिकांना ऑर्डर मिळाली असती तर पाकिस्तान नावाचा आतंकवादाला प्रोत्साहन देणारा देश एका दिवसात नेस्तनाबूत झाला असता. परंतु भारतीय नेत्यांच्या कचखाऊ धोरणामुळे व मागील 15 - 20 वर्षाचा भारतीय नेत्यांच्या इतिहास पाहता पाकिस्तानच काय तर भूतान, नेपाळ व बांगलादेश सारखे ज्या देशांचा आकार आपल्या तुलनेत काहीच नाही अशी राष्ट्रे सुद्धा भारताला डोळे दाखवू लागली आहेत. चीन सारखा बलाढ्य शत्रू भारताच्या शेजारी असताना भारत पाकिस्तानच्या प्रत्येक चुका जर पोटात घालू लागला तर उद्या चीनने आगळीक करून अरुणाचल प्रदेश जर आपल्या ताब्यात घेतला तर भारतीय राजनेते निषेध करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही असे वाटते.
संसदेचा मान ठेवा म्हणून नेहमीच भारतीयांना उपदेशाचे डोस पाजले जातात त्या भारताच्या संसदेवर 2001 साली पाकिस्तानच्या अनैतिक सैनिक म्हणजेच लष्कर ऐ तोयबाच्या आतंकवाद्यांनी हल्ला केला त्या वेळीसुद्धा भारतीयांना वाटले की पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, भारतीय सैनिकसुद्धा पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सज्ज झाले होते पण पुन्हा एकदा भारतीय नेत्यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे सोडून पाकिस्तान बरोबर पुन्हा बोलणी सुरू केली. आपल्या नेत्यांमध्ये इतकी हिंम्मत सुद्धा नाही की या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशी मंजूर करून त्याला फासावर लटकवणार.
26/11 चा हल्लासुद्धा अजूनही ताजाच आहे. त्यावेळीही वाटले की आता खरी वेळ आली आहे पाकिस्तानला धडा शिकविण्याची पण पुन्हा परिस्थीती ""जैसे थे'' झाली. आणि "अमन की आशा' सुरू झाली. क्रिकेट डिप्लोमसी सुरू झाली आणि सर्वच जण तो भयानक हल्ला विसरले नाहीत पण थोडा बाजूलाच ठेवला. नंतर जिवंत सापडलेल्या आतंकवाद्याला (जो मरायलाच आला होता) त्याला फासावर चढवून भारतीय नेत्यांनी आपण कुणाला भीत नाही जणू अशाच प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु अफझल गुरुचा विषय येताच सत्ताधारी पक्ष मात्र अनुत्तरीतच होतो.
रामदेव बाबांचे आंदोलन असो, किंवा त्या बलात्कार झालेल्या तरुणींसाठी युवक रस्त्यावर उतरलेले असो नेहमीच राज्यकर्त्यांनी आपल्या बळाचा वापर करून ही सर्व आंदोलने मोडून काढलीत. पण एखादा देश जेव्हा भारताची कुरापत काढतो तेव्हा आपले नेते फक्त निषेध किंवा तीव्र निषेध नोंदविण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत. देशाच्या गृहमंत्र्यांना तर कोणत्याच गोष्टीची माहिती नसते. झारखंडमध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या नक्सलींच्या हल्यात 30 जवान मारले गेलेत पण गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्यापलीकडे काहीच केले नाही.
भारतीय सैनिक सीमेवर तर भारतीय जनता सीमेच्या आत रोजच मारले जात आहेत पण ठंडा करके खाओ या प्रवृत्तीमुळे या अखंड देशाचे खंड व्हायला वेळ लागणार नाही. जी इच्छा शक्ती भारतीय नागरिक व भारतीय सैनिकांमध्ये आहे ती इच्छाशक्ती भारतीय नेत्यांमध्ये का नाही? अमेरिका सारखा देश आपले नागरिक असो वा सैनिक, एक असो किंवा हजार त्यांच्यावर झालेला हल्ला हा आपल्या देशावर झालेला हल्ला समजून तो त्यादेशावर हल्ला करतो किंवा त्या देशाला जगापासून पूर्णपणे अलिप्त करून ठेवतो. इस्राईल सारखा देश जो सर्व बाजूने मुस्लीम देशांनी वेढलेला आहे त्या देशावर जर कुणी हल्ला केला तर तो देश त्या देशात जाऊन त्या हल्लेखोरांना घेऊन येतो. ही हिम्मत आपल्या सैनिकांकडे पण आहे पण त्याला परवानगी देण्याची हिंम्मत आपल्या नेत्यांकडे नाही. नेत्यांचे एकच वाक्य नेहमी असते की आम्हाला पाकिस्तान बरोबर युद्ध नको मैत्री हवी आज नाही भविष्यात तरी तो आपल्याशी मैत्री करेल. पण उद्या येणाऱ्या भविष्यासाठी जो आपल्याला माहीत नाही कसा असेल अशा भविष्यासाठी आपण आपल आज पूर्णपणे उध्वस्थ करू लागलो आहोत. त्यामुळेच भारताने यावेळी पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पाहिजे. एकतर भारताने पाकिस्तानचे विभाजन होण्यास उघड मदत केली पाहिजे जे पाकिस्तान नेहमीच करत आला आहे मग ते पंजाब असू देकिंवा काश्मीर. किंवा दुसरे म्हणजे भारताने पैशांच्या जोरावर पाकिस्तानमध्ये स्वत:च्या मर्जीतले सरकार आणले पाहिजे. कारण भारत सरकारची एकंदरीत वागणूक पाहता अजून एक कारगिल झाले तरी चालेल पण ये दोस्ती हम नही तोडेंगे म्हणून मैत्रीचे तुणतुणे वाजवत राहणार. मग ते कोणाचेही सरकार असो.
एकूण काय तर भारतीय नेत्यांमध्ये हिंमत नसल्यामुळे नेहमीच बोटचेपी भूमिका घेऊन वेळ मारून नेतात व त्यामुळे भारतीय जवानांच्या मनोधैर्यावर नेहमीच परिणाम होतो. व पाकिस्तान सारखा आतंकवादी देश पुन्हा पुन्हा भारताची कुरापत काढत राहतो. कारण त्यांना माहीत आहे आपण काही जरी केले तरी भारतीय जनता मोर्चे काढण्यापेक्षा व भारतीय नेते निषेध व्यक्त करण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत, आणि भारताने नेहमीच पाकिस्तानला हे सिद्ध करून दाखविले आहे की आपण फक्त निषेधच करू शकतो त्या पलिकडे काहीच नाही हे पाकिस्तान जाणून आहे त्यामुळेच पाकिस्तान नेहमीच भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न करीत असतो.
पाकिस्तानला धडा शिकवणे याचा अर्थ फक्त युद्धच करणे असा होत नाही. कारण युद्धामुळे पाकिस्तान तर संपुर्णपणे नष्ट होईलच परंतु आपणही पुन्हा शंभर वर्षे मागे जाऊ. इतर अनेक उपाय आहेत जे आपण पाकिस्तानवर आजमावू शकतो. आजही पाकिस्तानातून हजारो लोक दरवर्षी भारतात मोफत उपचारासाठी येतात, भारतीय चित्रपटात काम करण्यासाठी येतात, आपल्या वस्तू विकण्यासाठी येतात त्या सर्वांनाच भारताने भारतात येण्यापासून रोखले पाहिजे. सर्व व्यवहार ताबडतोब थांबवले पाहिजेत. पाकिस्तानला जाणाऱ्या बहुतांश नद्या ह्या भारतातूनच जातात त्यामुळे त्या नद्यांचे पाणी पुर्णपणे थांबवीण्याची धमकी भारताने दिली पाहिजे व गरज पडल्यास पाणी थांबविले पाहिजे. भारताने प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय नियम पाळलेच पाहीजेत असे काही नाही.
भारतीय नेत्यांना पृथ्वीराज चौहानचा इतिहास माहितच असेल. त्या घौरीला त्याने युद्धात पुन्हा पुन्हा हरवले व त्याने माफी मागीतल्यावर मोठ्या मनाने सोडून दिले पण ज्यावेळी घौरीने पृथ्वीराजवर विजय मिळविला तेव्हा त्याने त्याला माफ नाही केले त्यामुळे भारतीय नेत्यांनी या इतिहासातून योग्य तो बोध घेऊन कडक धोरण अंमलबजावणीत आणावे. कारण नेहमीच काही प्रश्न हे टेबलावर सुटत नाहीत.
एस. एन. दळवी
sachindalvi@outlook.com
sachindalvi@outlook.com

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply