Featured Posts
Recent Articles

स्वतंत्र भारताचे वाचाळ वीर

talking-headsअस म्हणतात की शब्दांचे तीर हे खऱ्या तीरांपेक्षा जास्त घाव करतात. खऱ्या तीरांमुळे माणूस मरतो पण शब्दांच्या तीरांमुळे माणूस जिवंतपणीच मरण यातना भोगतो. म्हणून म्हणतात की सुटलेला तीर आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. हा पण आपल्या देशातील काही नेत्यांनी व काही उच्चपदस्थ लोकांनी मात्र हे सिद्ध करून दाखविले आहे की काही वेळा दिलेला शब्द मागे घेता येत नसेल पण तो आपल्या सोयीनुसार फिरवता येतो. असेच काही नेते आणि उच्चपदस्थ आपल्या समाजाला लाभले आहेत. ज्यांच्या कतृत्त्वाचा फायदा - नुकसान हे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पक्षांनाच भोगावे लागतात.
भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयपूर येथे कॉंग्रेसच्या झालेल्या चिंतन शिबिरात जी मुक्‍ताफळे उधळली ती भारतीयांना नवी नव्हती पण ती मुक्‍ताफळे एक गृहमंत्री उधळतोय त्या मुळे त्या गोष्टीला महत्त्व आले. कारण जर त्यांच्या सांगण्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतात ""हिंदू'' आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे चालवितात. त्या केंद्रात ""हिंदू'' आतंवाद्यांना बंदूक चालविणे, बॉम्ब फोडणे, निर्दोष लोकांचे प्राण घेणे या गोष्टी शिकविल्या जातात. जर भाजप व रा. स्व. सघ जर खरोखरच अशी केंद्रे चालवत आहेत तर मग सरकार अजूनही झोपलेले का आहे? ती केंद्रे नष्ट का करत नाहीत? फक्‍त भाषणच का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. पण एकंदरीत देशाची परिस्थिती व कॉंग्रेसची परिस्थिती पाहता अशा प्रकारचे भाषण करून भारतीयांच्या मनात भाजप आणि रा. स्वे. संघ यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करावी असा होता. पण शब्दांचे बाण चालविण्यापुर्वी गृहमंत्र्यांनी एवढासाही विचार नाही केला की या विधानाचे आंतररराष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होतील? पाकिस्तान या विधानाचा कसा वापर करेल? 3 मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री टाळ्यातर मिळवतील पण जे शब्दांचे बाण सोडले आहेत ते कोणा कोणाचा वेध घेतील हे येणार काळच ठरवेल. असेच शब्दांचे बाण चालवणारे वीर आपल्या देशात अजूनही भरपूर आहेत. गृहमंत्री तर ताजे उदाहरण आहेत.
सुरवात करायची म्हटल्यास पहिले नाव डोळ्यासमोर येते ते कॉंग्रेसचे मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्री पदावर असलेले शशी थरूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून वादात सापडलेले असायचे पण त्यांना त्यामुळे कधी मंत्रिपद सोडण्याची वेळ आली नाही. पण त्यांना ट्विटरवर केलेले विधान मात्र फार भोवले व त्यांना आपल्या मंत्रीपदापासून हात धुवावे लागले. त्यांनी ट्विटरवर सांगितले की आयपील मध्ये कोच्ची संघ एका कंपनीला मिळवून द्यायला मदत केली होती. आणि ही मदत मोफत नव्हती. या ट्विटर प्रकरणामुळे संपूर्ण देशात वादळ उठलेले व त्यामुळे शशी थरूर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. जर ट्विटरवर त्यांनी अशाप्रकारचे विधान केले नसते तर त्यांना त्यावेळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नसता.
दुसरे जर वाचाळ वीर आठवत असतील तर ते आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा. मृदू भाषिक अन्‌ विवादोपासून नेहमीच दूर असणारे. महाराष्ट्राचे जेव्हा ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तेव्हा सर्वांनीच म्हटले की या पदाला योग्य उमेदवार मिळाला. पण मृदू स्वभावाचे असले तरी आबासुद्धा आपल्या वाणीवर ताबा ठेवू शकले नाहीत. 26/11 ला जेव्हा मुंबईवर आतंकवाद्यांनी हल्ला केला व 3 दिवस मुंबईला रोखून धरले तेव्हा त्या हल्ल्यात 209 निर्दोष मारले गेलेले. कामटे, करकरे, ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन यांच्यासारखे शूरवीर यात शहीद झालेले. पण 26/11 हल्ल्यातील सर्व अतिरेकी मारले गेले व दोन दिवसांनी आबांसमोर प्रसारमाध्यमांचा भडिमार झाला तेव्हा त्यांनीही आपल्या भात्यातून शब्दांचे तीर सोडले, व ते तीर थेट जाऊन देशातील 120 कोटी जनतेच्या काळजातून आरपार गेलेत. ""बडे बडे शहरो मे, ऐसी एक आध घटना होती रहती है'' हे त्यांचे वाक्‍य. या वाक्‍यामुळे आबांची खुर्ची गेली. त्यांना अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्यात. त्यांना आता या विषयावर आता बोलायचीपण इच्छा नाही आहे. मी मान्य करतो की आबांच हिंदी इतर नेत्यांच्या तुलनेत फारच कच्चे आहे पण आपण काय बोलतो आहोत याचच तारतम्य नाही बाळगले तर शब्दांचे शर कुणाचा ना कुणाचा तरी बळी घेणारच. यावेळी त्या शब्दांच्या शरांनी आबांच्या मंत्रिपदाचा बळी घेतला. पुन्हा ते या मंत्रिपदी आले हा भाग वेगळाच. पण त्यांना या वाक्‍याचे अनेक परिणाम भघेगावे लागले हे वेगळे सांगायची गरज नाही.
लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जेव्हा आंदोलन सरू केले तेव्हा अण्णा हजारेंबरोबर अजून एक नाव तेव्हा प्रकाश झोतात आले ते म्हणजे कॉंग्रेसचे प्रवक्‍ता मनीष तिवारी. त्यांचा तर याप्रकरणात महाभारतातील अभिमन्यूच झाला होता. यांनी कॉंग्रेसला वाचविण्यासाठी स्वत: रणांगणात उतरून शब्दांचे बाण अण्णा हजारेंवर सोडून त्यांना रक्‍त बंबाळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण महाभारतातल्या अभिमन्यू प्रमाणे त्यांना चक्रव्यूहात प्रवेश तर केला पण त्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही. पण या अभिमन्यूने माफी नावाचे शस्त्र उपसले व शरणागती पत्करत पुन्हा त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य दाखविले. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन पुकारलेले होते पण अण्णाच किती भ्रष्टाचारात बुडालेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी काही खोटे तर काही अर्धवट पुरावे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवलेत. अण्णाहजारेंबद्दल फारच खालच्या दर्जाची व हिन भाषा वापरली पण त्यांच्यावर सर्वच बाजूने टीका झाल्यावर व सर्व सादर केलेले पुरावे हे खोटे आहे हे उघड झाल्यावर मनीष तिवारी यांना संपूर्ण देशाच्या समोर अण्णा हजारेंची माफी मागावी लागली.
या वाचाळ वीरांमध्ये अण्ण हजारेही तसे मागे नाही आहेत. जेव्हा कृषिमंत्री शरद पवार यांना एका शीख युवकाने थोबाडीत मारली व हे वृत्त प्रसार माध्यमांनी अण्णांच्या कानावर घातले तेव्हा अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया होती "एक ही मारा?' ही प्रतिक्रिया संपूर्ण देशभरात वाऱ्याच्या वेगाने पसरली व अण्णा हजरेंच्या समर्थकांना त्यांचा बचाव करता करता नाकी नऊ आली होती.
या यादीत अजून एका महानव्यक्‍तीचे नाव घ्यावे असे वाटते ते म्हणजे आमचे श्री. आसाराम बापू यांचे. अत्यंत आदरणीय असे हे महाराज. मागील एक दोन वर्षात हे सुद्धा त्यांच्या मठात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिले होते. पण आसाराम बापूंनी सुद्धा या महाभारतात शब्दांचे बाण अगदी नेम धरून चालविले. दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेने देश पेटलेला असताना बापूंनी अजब विधान केले. "जर त्या मुलीने त्या युवकांना तेव्हाच भाऊ मानलं असते, त्यांना देवाची शपथ घातली असती तर ही घटना घडली नसती.' आत या त्यांच्या वाक्‍यावर काय बोलायचे हाच एक मोठा प्रश्‍न आहे. पण बापूंनी या महाभारतात सोडलेले बाण बऱ्याच स्वयंसेवी संस्था व नागरिकांना बसले. जेव्हा बापूंविरूद्ध वातावरण तापू लागले तेव्हा त्यांनी सर्व खापर प्रसारमाध्यमांवर आणून फोडले की सर्व प्रसार माध्यमे कुत्री आहेत म्हणून व त्यांनीच आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला.
वरील सर्व वीर फक्‍त काही वेळाच या महाभारतात आपापले शब्दांचे बाण चालवून निघून गेलेत. पण या महाभारतात एक व्यक्‍ती अशी आहे की जी कित्येक वर्षे गांधी घरण्योच्या रक्षणार्थ शब्दांचे तीर या रणभूमीवर चालवत आहे. ती व्यक्‍ती म्हणजे दिग्विजय सिंग. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे निष्ठावंत की काय म्हणायचे तुम्हीच ठरवा. पण त्यानीं गांधी घरण्याविरूद्ध आवाज उठविणारे मग ते कोणीही असोत नेहमीच आपल्या शब्द बाणांनी त्या विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्विजय जेव्हा आपल्या पक्षाच्या बचावासाठी काही बोलतात तेव्हा असा प्रश्‍न पडतो की ते आपल्या पक्षाला वाचविण्यासाठी बोलत आहेत की पक्षाला बुडविण्यासाठी? कधी कधी त्यांच्या शब्दबाणांमुळे असे जाणवते कि त्यांना हिंदू धर्म, हिंदू राजा, मराठी भाषा, महाराष्ट्र या सर्वांचा भयंकर द्वेष आहे. कधीही शब्दांचे बाण सोडताना ते कोणत्या गोष्टीचा विचार करतात हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण 26/11 सारखा हल्ला हा हिंदूंशी जोडून आपल्या अकलेचे तारे दिग्गीराजांनी तोडले होते. अण्णांच्या आंदोलनात सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी अण्णावर आपले शाब्दिक बाण सोडले होते ते पाहून असे वाटले की त्यांचा नेम नक्‍की अण्णांचे आंदोलनावर आहे की स्वत:च्याच पक्षावर आहे. जर भारताचा वाचाळ वीर जर पुरस्कार कुणाला देण्याचा झाला तर तो दिग्विजय सिंग यांच्या शिवाय कुणा दुसऱ्याला देता येणे शक्‍य नाही. कारण आपल्या शब्दबाणांमध्ये किती शक्‍ती आहे हे त्यांनी आतंकवादी ओसामाला "ओसामाजी' आणि 26/11 चा मुख्यसुत्रधार हाफीज सईद याला "साहेब' म्हणून दाखवलीच आहे. सतत खोटं बोलून व गांधी कुटुंबीयांच्या मागेमागे करून त्यांची कृपादृष्टी पाडून घेण्याचा प्रयत्न करणारे दिग्विजय सिंग यांच्या सारखा वाचाळ वीर हा भारतात एकमात्रच असणार. असा वाचाळ वीर शत्रूलाही लाभू नये हीच इच्छा करावीशी वाटते.
या देशातल्या शब्द धनुर्धरांच्या शब्दांचे बाण तुम्ही अनुभवलेले असतील. तुम्हालाही कधी तरी केव्हा तरी त्यांचे शब्दांचे तीर बसले असतील. तुम्हीही घायाळ झाला असाल. अजूनही बरेच अशाप्रकारचे वीर आपल्या देशात आहेत, पण त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू... तुम्हीसुद्धा शब्दांचे बाण चालवताना काळजी घ्या नाहीतर कधीतरी तुमचे पण नाव या अनुसुचित दिसेल.

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud